अजित पवार यांनी पुन्हा एकदा अचानक राजकीय सूत्र हलवत थेट विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उडी घेतली. इतकंच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आपल्याबरोबर येण्यास भाग पाडलं आणि त्यांनाही मंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ते रविवारी (२ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांनी सुरुवातीला हा निर्णय घेण्यामागील पार्श्वभूमी आणि कारणं सांगितली. यानंतर पत्रकारांनी वारंवार शरद पवार यांचा पाठिंबा आहे का? शरद पवारांशी चर्चा झाली आहे का? शरद पवार यांना फोन केला होता का? असे प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार यांनी थेट शरद पवारांचा उल्लेख करणं टाळलं. तसेच सर्वांचा पाठिंबा आहे, सर्वांशी फोनवर बोललो, सर्वांचा आशीर्वाद आहे अशी उत्तरं दिली.

व्हिडीओ पाहा :

प्रत्येकवेळा शरद पवार या दोन शब्दांना बगल

अजित पवारांनी राष्ट्रवादीतील सगळ्यांशी चर्चा केली आहे, असे सांगितले. परंतु शरद पवारांशी चर्चा केली का असं विचारलं असता अजित पवारांनी सगळ्यांमध्ये सगळे येतात, असं सावध उत्तर दिलं. अनेकदा प्रश्न विचारूनही त्यांनी प्रत्येकवेळा शरद पवार या दोन शब्दांना बगल दिली.

हेही वाचा : VIDEO: “…म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला”, अजित पवारांनी केला मोठा खुलासा

“पुढील सर्व निवडणुका राष्ट्रवादी म्हणून घड्याळ या पक्षचिन्हावरच लढवणार”

राष्ट्रवादी काँग्रेस पुढील सर्व निवडणुका भाजपा-शिंदे गटाबरोबरच लढणार का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “विधानसभा, लोकसभा निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या पक्षचिन्हावरच लढवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेते निर्णय घेतील.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar avoid to mention on to talk directly on sharad pawar after ncp rebel pbs