मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांच्या बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या पुतळय़ास आणि पुण्यातील ऑलिम्पिक भवनास आघाडी सरकारच्या काळात परवानगी नाकारली गेली. दुसऱ्यांकडून सकारात्मकतेची अपेक्षा ठेवताना आपणही आत्मचिंतन करावे, असा टोला काँग्रेसला लगावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे असतात’. आम्हीही काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही, जनतेचा पाठिंबा असेपर्यंत सत्तेत राहू, असे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारने आमदारांच्या निधीवाटपात २०१९ पासून स्वीकारलेले सूत्रच कायम ठेवले असून त्यात बदल केला नसल्याचे विरोधकांना सुनावले. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात पुरेसे निधीवाटप केले जात नसल्याने विरोधकांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने ४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या असून त्या बहुमताने संमत करण्यात आल्या. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर पवार यांनी उत्तर दिले. तेव्हा पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारमध्ये काम करीत असताना आलेले अनुभव सांगितले.

वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींप्रमाणेच सर्वाना आदरणीय होते. पण तरीही खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकाराने बोरिवलीत उभारल्या गेलेल्या पुतळय़ास परवानगी नाकारण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मी, शेट्टी आदी त्या दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीत होतो, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी विरोधी आमदारांना निधीवाटप व अन्य मुद्दय़ांवर तक्रार केली होती. तेव्हा तुमचा चष्मा बदला व माझ्याकडे सावत्रभावाप्रमाणे बघू नका, तुम्हाला भावाप्रमाणे ओवाळणी देईन, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar challenge to congress mumbai amy
Show comments