शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा केला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रत्युत्तर दिली. “अशोक चव्हाण भाजपात जाणार असं संजय शिरसाटांना पिंजऱ्यातील पोपटाने काढलेल्या चिट्ठीत दिसलं का?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. ते सोमवारी (३ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “पिंजऱ्यात ठेवलेला पोपट बाहेर येतो आणि एक एक चिट्ठी चोचीने उचलतो. त्या चिट्ठीत संजय शिरसाटांना अशोक चव्हाण भाजपात जाणार असं दिसलं आहे का? काल सर्वांनी अशोक चव्हाण यांचं भाषण ऐकलं. कुणीही काहीही बोलायला लागलं आहे.”
“अशोक चव्हाणांची भेट झाली, तर मी त्यांना विचारेन”
“अशोक चव्हाण भाजपात जातील असं मला अजिबात वाटत नाही. असं असलं तरी आपण अशोक चव्हाण यांना याबाबत विचारू शकता. माझी आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली, तर मी त्यांना याबाबत विचारेन,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.
“रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही”
अजित पवार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर म्हणाले, “शरद पवारांनी ५०-५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काम करताना, सर्वच गोष्टींचा आदर केला आहे. अतिशय कष्ट घेऊन आमचे घराणे पुढे आले आहे. पण, अरविंद सावंतांनी सांगितले, रिक्षावाला हा माझा शब्द होता. शरद पवारांचा नाही.”
“खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही”
छत्रपती संभाजीनगर येथील सभेला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यावरून वेगवगळे राजकीय अर्थ काढण्यात येत होते. यावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. “उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही ते ताठ बसता येईल, अशी खुर्ची वापरतात. म्हणून सभेच्या ठिकाणीदेखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. यात खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.