गेल्या वर्षी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ईडीनं यासंदर्भात अजित पवारांशी संबंधित व्यक्तींवर धाडीही घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईडीकडून अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच ईडीने या प्रकरणाच्या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा समावेश न केल्यानं त्यांना क्लीनचिट दिल्याची चर्चा सुरू झाली. यावर आता स्वतः अजित पवार यांनी भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही.”

“अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही”

“ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांना ईडीची क्लीनचिट? आरोपपत्रात नावच नाही!

“मला शरद पवार फक्त म्हणाले होती की…”

पवार-ठाकरे भेटीवर अजित पवार म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील तपशील मला माहिती नाही. मला शरद पवार फक्त म्हणाले होती की, उद्धव ठाकरे मला भेटायला येणार आहेत. बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यामुळे उद्धव ठाकरे भेटायला आले असतील. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे दोघेही भेटायला आले होते. तास दीड तास त्यांच्यात चर्चा झाल्याचं बातम्यांवरून माहिती मिळाली आहे.”

“मध्यंतरी वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली”

“मध्यंतरी वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यानंतर मविआतील घटकपक्षांमध्ये अंतर पडते की काय अशा बातम्याही पसरवल्या गेल्या. त्यावर या बैठकीत चर्चा झाली असावी. मला नेमके विषय काय होते माहिती नाही, पण १ मे रोजी मुंबईतील बीकेसीला जे सभा होणार आहे त्यावर चर्चा झाली हे मला माहिती आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on ed clean chit in jarandeshwar sugar factory case pbs