“छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलत होते. या घटनेविषयी त्यांनी दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.”

“कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी,” असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

“आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर सहन करणार नाही”

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे जलसिंचन मंत्री जयंत पाटील म्हणाले, “संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो.”

हेही वाचा : अमित शाहांचा पुणे दौरा वादात; छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप

“छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापी सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी जयंत पाटलांनी केली.

अमित शाहांचा पुणे दौरा वादात; महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची पायाभरणी करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. शाहांच्या या दौऱ्यामुळे भाजपाला पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल अशी आशा पक्षाला आहे. या दौऱ्यासाठी अमित शाह यांचे फोटो असलेले मोठमोठे पोस्टर्स शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच नगरसेवकांनी मात्र शुक्रवारी आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. या पोस्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नाहीत, त्यामुळे त्यांचा अवमान झाल्याचा आरोप भाजपावर करण्यात आला आहे.

Story img Loader