राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजपाप्रणित आघाडी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. महाराष्ट्रात ज्या भाजपा सरकारने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं त्याच भाजपाबरोबर नागालँडमध्ये राष्ट्रवादीने युती केल्याची टीका होत आहे. याबाबत विचारलं असता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (९ मार्च) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “मी सुरुवातीला राजकारणात आलो तेव्हा १९९१ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झालो. त्यावेळी ४-६ महिन्यासाठी खासदार राहिलो आणि लगेच राज्यात राज्यमंत्री झालो आणि महाराष्ट्रातील काम बघायला लागलो. तेव्हापासून मी महाराष्ट्राशी संबंधितच राहिलो. मला अनेकदा वेगवेगळी पदं मिळाली. परंतु, ती पदं मिळूनही मी राष्ट्रीय पातळीवर लक्ष देत नाही.”
“नागालँडविषयी मला एवढंच माहिती आहे की…”
“राष्ट्रीय पातळीवर गोष्टी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे इत्यादी नेते बघतात. त्यामुळे नागालँडविषयी मला एवढंच माहिती आहे की, नरेंद्र वर्मा यांना नागालँडमध्ये निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. त्यांनी मला याबाबत थोडी माहिती दिली. तिथं आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या एवढी मला माहिती आहे. त्यासाठी तेथील सर्वांचं अभिनंदन,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
“सर्वोच्च नेते बोलल्यावर आम्ही त्यावर प्रतिक्रियाच देत नाही”
नागालँडमध्ये नवाब मलिकांना तुरुंगात टाकणाऱ्या भाजपाबरोबर जाऊन बसलात, अशीही टीका राष्ट्रवादीवर होत आहे. याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “याबाबत मी शरद पवारांची माध्यमांमध्ये दिलेली प्रतिक्रिया मी पाहिली. पक्षाचे सर्वोच्च नेते एखाद्या विषयावर मुद्दे मांडतात त्यानंतर आम्ही त्यावर प्रतिक्रियाच देत नाहीत.”
“मी महाराष्ट्राविषयी काही असेल तर त्यावर उत्तर देऊ शकेन”
“शरद पवार पक्षाच्या सर्वोच्च पदावर बसले आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत असतात. महाराष्ट्राविषयी काही असेल, तर मी त्यावर उत्तर देऊ शकेन,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.