राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे”, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तर भाकरी फिरवणे म्हणजे अजित पवारांना दूर केलं पाहिजे, असं अर्थ होत असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२७ एप्रिल) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं. हे काही बदलाचे संकेत आहेत का? अशी विचारणा केल्यावर अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी गेल्या ५५-६० वर्षांच्या राजकीय जीवनात काही प्रसंग लक्षात घेऊन अनेकदा भाकरी फिरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नवे लोक पुढे आले आहेत, हे सर्वांनी पाहिलं आहे.”

“सगळ्यांना वाटतं की मला प्रमोशन मिळावं”

“आम्ही चाळीशीत असताना शरद पवारांनी मला, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी दिली. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आम्ही आमचं काम दाखवू शकलो. जसं सगळ्यांना वाटतं की मला प्रमोशन मिळावं तसं नव्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. माझीही तीच इच्छा आहे की, आमदारकी-खासदारकीत काही नवे चेहरे आले पाहिजे,” असं अजित पवारांनी नमूद केलं.

राज ठाकरेंच्या सल्ल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी अजित पवारांना सल्ला देताना बाहेर लक्ष देता तसं काकांकडेही लक्ष द्या, असं म्हटलं. यावर अजित पवारांनीही टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले, “ठीक आहे, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं, तसं मीही माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन.”

राज ठाकरे काय म्हणाले होते?

अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मला ५ तारखेच्या माझ्या रत्नागिरीतील सभेत सविस्तर बोलायचं आहे. एका वाक्यात बोलायचं नाही, पण अजित पवार बाहेर जेवढं लक्ष देत आहेत तेवढंच त्यांनी काकांकडेही लक्ष द्यावं.”

हेही वाचा : “…म्हणून माझी जिरवू नका”, ‘त्या’ निवडणुकीबाबत अजित पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं म्हटले. याबाबत अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी अमोल कोल्हेंच्या म्हणण्याला शुभेच्छा असं एका वाक्यात उत्तर दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on sharad pawar statement about power sharing policy pbs
Show comments