राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरली होती. दरम्यान, या मोर्च्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे भाजपा सरकारवर टीकास्र सोडले.
काय म्हणाले अजित पवार?
“काही महिन्यांपूर्वी जे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. दुर्देवाने महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला तरी जेव्हा महाराष्ट्रावर संकट असतं, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उटतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
“बेताल वक्तव्यांमागे सुत्रधार कोण?”
“राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्ते मोर्च्यासाठी दाखल झाले आहेत. मुळात ही वेळ यायला नको होती. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत जी अपमानस्पद विधानं केली जात आहेत, त्याला कुठं तरी विरोध केला पाहिजे. शिवराय आपले दैवत आहेत. शाहू, फुले आंबेडकर आपला अभिमान असताना त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्याचे काम कशासाठी सुरू आहे? कोण यामागे सुत्रधार आहे, याच शोध घेतला पाहिजे”, असेही ते म्हणाले.
“जनाच नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे”
चुकीचे विधान एखाद्या वेळेस होऊ शकते, त्यानंतर माफी मागणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही आपली पंरपरा आहे. मराठी माणसावर तसे संस्कार झाले आहेत. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर दुसरे मंत्री बोलतात. कोणी महापुरुषांच्या महान कार्याला भिकेची उपमा देतात. जनाच नाही तर किमान मनाची लाज वाटायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
“राज्यपालांना पदावर हटवा”
“कायदा सुव्यस्था राखली गेली पाहिजे, याविषयी कोणाचेही दुमत नाही. आज प्रचंड उन्हात ज्या संख्येने तुम्ही आला आहात, हे बघून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने शिवरायांबाबत विधानं झाली आहेत, ती बघून राज्यपालांना त्यांच्या पदावरून हटवले पाहिजे, जे आमदार, मंत्री अशी विधानं करत आहेत, त्यांनाही पदावरून हटवले पाहिजे. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत कडक कायदा करावा”, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.