आलोक देशपांडे, एक्स्प्रेस वृत्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र लोकशाहीत मतदानाचा प्रत्येकाला हक्क असतो. त्यामुळे जनताच काय ते ठरवेल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात जातीच्या आधारे मतदान होत नाही. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजाचे एकगठ्ठा मतदान महायुतीच्या बाजूने होईल, असे वाटत नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

‘व्होट जिहाद’ व ‘बटेंगे तो कटेंगे’ याबाबत आम्हीच यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. उत्तर भारतात कदाचित हा मुद्दा चालेल, पण आपल्या राज्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. आमची विचारसरणी ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांना मानणारी असून, हीच विचारधारा राज्याला पुढे नेईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ओबीसी मतांचे महायुतीच्या बाजूने ध्रुवीकरण होईल का, या प्रश्नावर अजित पवार यांनी ‘महाराष्ट्राने आजवर जातीच्या आधारे मतदान करण्याचे टाळले आहे’ असे उत्तर दिले. ‘एकेकाळी गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, ना. स. फरांदे यांसारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांमुळे वंजारी समाज एकगठ्ठा भाजपच्या मागे उभा राहिला. मात्र, तेवढ्या प्रमाणात आता घडेल, असे वाटत नाही,’ असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”

कमी जागा लढवून मुख्यमंत्री कसे होणार या प्रश्नावर त्यांनी सावध उत्तर दिले. मला आणखी वादात ओढू नका. मात्र केवळ चाळीस खासदार किंवा आमदार असताना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र या विषयावर प्रतिक्रिया देणार नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता, मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीने प्रयत्न करूनही त्यांचा अपप्रचार चालला नाही. तसेच काही गोष्टींत आम्ही सुधारणा केली. कांद्यावरील निर्यात बंदीचा उत्तर महाराष्ट्रात आम्हाला फटका बसला. मात्र आता ही निर्यातबंदी उठवण्यात येऊन, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत असल्याचे पवार यांनी नमूद केले. तर योग्य भाव मिळत नसल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी संतप्त असल्याचे विचारता, आम्ही उत्पादकांना प्रति हेक्टर पाच हजारांचे अनुदान दिले. या मुद्द्याला दोन बाजू आहेत. जर सोयाबीनची किंमत वाढविली तर त्यापासून निर्मिती होणारे तेल महागणार, मग संतप्त प्रतिक्रिया येणार. त्यामुळे याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. आचारसंहिता संपताच याबाबत मध्यममार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.

बारामतीमध्ये विजयाचा विश्वास

बारामतीमधील मतदारांनी लोकसभेला पवारसाहेबांना प्राधान्य देऊन सुप्रिया सुळे यांना विजयी केले. मी नेहमीच येथील जनतेसाठी कार्यरत आहे. त्यांनी माझे काम पाहिले असून, विधानसभेला बारामतीमधून विजयी होऊ, तसेच राज्यात महायुतीला १७५ जागा मिळतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. निकालानंतर शरद पवार यांच्याबरोबर जाण्याची शक्यता यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express zws