पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. “महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार यांनी सर्वप्रथम पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, असं सूचक वक्तव्यही केलं. यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल मिटकरी म्हणाले, “सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. खरंच प्रत्येक बहिण इतकी भाग्यवान नसते की, तिचं रक्षण करणारा भाऊ प्रत्येक घरात असावा. मात्र, याबाबत सुप्रिया सुळे अपवाद आहेत. कारण अजित पवारांसारखा एक भाऊ त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.”

“अजित पवारांनीच सुप्रिया सुळेंना बारामतीत मतदारसंघात आशीर्वाद दिले”

“शरद पवारांनंतर अजित पवारांनीच सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघात जे आशीर्वाद दिले, ज्या पद्धतीने अजित पवार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे राहिले त्याबद्दल त्या खरंच भाग्यवान आहेत,” असंही अमोल मिटकरींनी म्हटलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

संसदेत भाषण करताना सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. आपल्या बहिणीचं चांगलं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या घरात नसतो. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

अमित शाह यांच्या विधानाचं समर्थन करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचं कल्याण व्हावं असं वाटतं. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं.

हेही वाचा : “सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं आहे, वैफल्यग्रस्त भूमिकेतून…”, अजित पवार गटातील नेत्याची टीका

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, महिला वर्गासाठी पुरुषही तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक पुरुषांनी महिला वर्गाला सक्षम केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांच्यामुळेच आज माझ्यासारखी महिला इथे उभी आहे. भारतात सर्वात आधी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण राबवलं. माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar faction comment on supriya sule statement about brother sister pbs