भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोचरी टीका केली आहे. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशी टीका पडळकरांनी केली. पडळकरांच्या टीकेनंतर अजित पवार गट आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दादर नायगाव येथे ‘जोडे मारो’ आंदोलन केलं असून पडळकरांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनादरम्यान, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष प्रमोद अप्पा पाटील म्हणाले, “गोपीचंद पडळकर हा एक बालिश आणि बिनडोक कार्यकर्ता आहे. तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सातत्याने काही ना काही बेताल वक्तव्य करत असतो. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे आंदोलन करत आहोत.”

हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

प्रमोद पाटील पुढे म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (अजित पवार गट) गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देणार आहोत. पडळकर आणि त्यांच्या प्रवृत्तीला त्वरित आळा घालण्यासाठी आणि ही महायुती अखंडीत राहण्यासाठी अजित पवारांसारखा नेता उभा राहिला पाहिजे. त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यासाठी जाणार आहेत, असंही प्रमोद पाटील म्हणाले.

हेही वाचा- “बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो”, सुप्रिया सुळेंचं संसदेत विधान

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar faction protest against bjp mla gopichand padalkar for controversial statement rno news rmm