अगदी बहुमतात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून स्वतःसह ९ राष्ट्रवादीच्या आमदारांचा शपथविधी पार पाडला. या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट आणि अजित पवारांचा गट यांच्यात जोरदार दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच अजित पवारांनी मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीला हजेरी लावली. मंत्रालयात आल्यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं.
मंत्रालयात गेल्यावर अजित पवारांनी ट्वीट करत म्हटलं, “आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.”
मंत्रीमंडळ बैठकीच्यावेळी राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : VIDEO: बंडखोरीनंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून ‘हे’ ८ महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, या बंडानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने ८ महत्त्वाचे निर्णय घेतले.