राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांच्या अपमानासह इतर मुद्द्यांवर १७ डिसेंबरला निघणाऱ्या महाविकासआघाडीच्या महामोर्चाची माहिती देताना असं वक्तव्य केलं की पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. समोर उपस्थित पत्रकारांपैकी एका पत्रकाराने हिंदीत प्रश्न विचारत हिंदीत उत्तर द्या असं म्हटलं. यावर अजित पवारांनी ‘अरे मराठी माणसाचा मोर्चा आहे, हिंदीत कुठे बोलायला सांगतो,’ असं वक्तव्य केलं. ते गुरुवारी (१५ डिसेंबर) मुंबईत मविआने महामोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
पत्रकाराने हिंदीत बोला असं म्हटल्यानंतर अजित पवार म्हणाले, “अरे महाराष्ट्राचा माणसाचा मोर्चा आहे, मराठी माणसाचा मोर्चा आहे, हिंदीत कुठे बोलायला सांगतो.” यानंतर अजित पवार यांच्याशेजारी बसलेले माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सगळ्यांमध्ये हशा पिकला.
व्हिडीओ पाहा :
“मुख्यमंत्र्यांना ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यावर २० दिवसांनी कळतं का?”
यानंतर अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या ट्विटरबाबत केलेल्या दाव्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक होतं आणि २० दिवसांनी त्यांना कळतं असं कधी होतं का? जेव्हा हॅक झालं तेव्हा तक्रार दाखल का केली नाही? त्यांना कोणी रोखलं होतं?”
“महाराष्ट्रातील लोक नाराज झाले आहेत”
“हे चुकीचं आहे. त्यांनी महाराष्ट्राविषयी जी वक्तव्ये केली ती चुकीची आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लोक नाराज झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी अजित पवारांनी केली.
“हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही”
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला भोंगळ कारभार, छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांकडून होणारी बेताल वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी अशा विविध समस्यांविषयी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही त्यामुळे राज्यातून ज्या लोकांना या मोर्चात सहभागी व्हायच आहे त्यांनी निश्चितपणे सामील व्हावे.”
“मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने निघेल यात कोणतीही विद्ध्वंसक घटना घडणार नाही. लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना ज्याप्रमाणे मोर्चा निघतो. त्याप्रकारचे स्वरूप या मोर्चाचे असेल. राज्य सरकारकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली आहे. अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी ती मिळेल,” असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
हेही वाचा : मविआच्या महामोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारने परवानगी नाकारली आहे का? अजित पवार म्हणाले…
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेसचे नेते नसीम खान, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, माकपचे प्रकाश रेड्डी, सीपीआयचे मिलिंद रानडे, शेकापचे राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.