महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हेही आक्रमक झालेले दिसले. विशेष म्हणजे निधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलत असताना सत्ताधारी बाकावरील काही आमदारांनी अडथळा आणल्यानंतर पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, असा सवाल केला.
अजित पवार म्हणाले, “देवेंद्रजी मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की आपण मनाचा मोठेपणा दाखवा. पाठीमागच्या काळात देखील २५-१५ चा निधी देण्याची कल्पना या नेत्यांच्या सुपिक डोक्यातून आली होती. २५-१५ आणि ठोक तरतूद असे निर्णय घेण्यात आले. त्याचा वापर मीदेखील मोठ्या प्रमाणात करून घेतला. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. २५-१५ चा निधी देताना आम्ही महाविकासआघाडीमधील लोकांना पाच कोटीचा निधी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याचवेळी आम्ही तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना दोन दोन कोटी रुपये दिले.”
“आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”
यानंतर सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी गोंधळ केला. यानंतर अजित पवार म्हणाले, “एक मिनिट, मघाशीच सांगितलं आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे ते नंतर उठून बोला.” यानंतरही सत्ताधारी पक्षातून एक अजित पवारांच्या भाषणात अडथळा आणला गेला. यावर पवार संतापले आणि “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?” असा सवाल केला.
“सध्या २०२१ च्या कामांनाही स्थगिती दिली आहे”
यानंतर अजित पवार पुन्हा निधीच्या मुद्द्यावर बोलत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना आम्ही दोन दोन कोटी रुपये देऊ असं सांगितलं होतं. त्यानंतर दोन कोटी दिले नाही, एक कोटी दिले. मात्र, आम्ही सुरुवात केली. सध्या २०२१ च्या कामांनाही स्थगिती दिली आहे.”
हेही वाचा : “घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है”, बारामतीमधील हत्येचा थेट अधिवेशनात उल्लेख करत अजित पवार म्हणाले…
“तुमचं सरकार होतं तेव्हा पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या. त्यावेळी २५-१५ चा निधी भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांना मिळाला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार आलं तेव्हा खर्च न झालेला निधी थांबवला गेला आणि तो निवडून आलेल्यांना वाटण्यात आला हे मला चांगलं आठवतं. हे मी मान्य करतो,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.