राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावनिक झाले. तसेच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांनी हा निर्णय लगेच मागे घ्यावा. त्याशिवाय आम्ही गावाकडे परत जाणार नाही, अशी भूमिका घेतली. विशेष म्हणजे हे कार्यकर्ते थेट मंचावर जमा झाल्याने तेथे काहिसा गोंधळ उडाला. यानंतर विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले. ते मंगळवारी (२ मे) मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर बोलत होते.
मंचावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर अजित पवार म्हणाले की, माझी विनंती आहे की, सगळ्यांनी खाली खुर्च्यांवर बसून घ्यावं. मात्र, यानंतरही कार्यकर्ते घोषणा देत होते आणि शरद पवारांनी लगेच निर्णय मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी करत होते. यावर अजित पवार संतापले. ते आक्रमक कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले, “ए गप रे, तुलाच फार कळतं का? सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्या. यावर शरद पवार बोलतील. तुम्ही बसून घ्या.”
“तुम्ही बसून घ्या सांगितलं तर कळत नाही का?”
यानंतरही कुणी जागेवरून न हलल्याने संतापून अजित पवार म्हणाले की, शरद पवार यावर बोलतील. तुम्ही बसून घ्या सांगितलं तर कळत नाही का? हवा येत नाही. पुढची गर्दी कमी करा.
“समिती जे ठरवेल ते शरद पवारांना मान्य आहे”
अजित पवार पुढे म्हणाले, “उपस्थित बंधु भगिनींनो, आत्ता तुम्ही शरद पवारांना आवाहन केलं आहे. त्यात त्यांची अशी इच्छा आहे की, तुमच्या भावना कळाल्या आहेत. आता समितीने लोकांचा कौल लक्षात घेऊन पुढील गोष्टी ठरवाव्यात. ती समिती जे ठरवेल ते शरद पवारांना मान्य आहे. माझी विनंती आहे की, समिती म्हणजे बाहेरचे लोक नाहीत. ते आपला परिवारच आहेत.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण, हे बदलाचे संकेत? अजित पवार म्हणाले…
“तुम्ही काही अडचण लक्षात घ्या”
“आम्हीही दुसरे बाहेरचे नाहीत. मी, सुप्रिया आणि बाकीचे सर्व आहेत. तुम्ही शरद पवारांना भावनिक साद घातली आहे. ती आमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे. तुम्ही काही अडचण लक्षात घ्या. ती समिती तुमच्या मनातील योग्य तो निर्णय घेईल, एवढी खात्री या निमित्ताने मी तुम्हाला देतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“…तर शरद पवार आम्हाला म्हणतील बस खाली”
उपस्थितांनी अजित पवारांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्यास सांगावं असा हट्ट केला. यावर अजित पवार म्हणाले, “अरे वेड्यांनो तुम्ही विनंती करू शकता. मी आणि सुप्रिया बोललो तर शरद पवार आम्हाला म्हणतील बस खाली. ते आम्हाला बोलून देणार आहेत का? कठीणच झालं आहे.”