विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षातील आमदारांकडून विविध प्रश्न उपस्थित करत मागण्या केल्या जात आहेत. मात्र, याचवेळी सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप झालेला पाहायला मिळाला. त्यांनी याआधी मंत्री हजर नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी उपस्थित असल्याचं म्हटलं. मात्र, आता मुख्यमंत्री आणि काही मंत्रीही नसल्याने पवार संतपाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होती तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे बसलेले होते. ते म्हटले मी स्वतः आहे. त्यामुळे बाकीचे मंत्री नव्हते तरी आम्ही ऐकून घेतलं. आता शालेय शिक्षणमंत्री सभागृहात नाही.” यानंतर शिक्षणमंत्री असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. यावर पवारांनी ते आत्ता आल्याचं नमूद केलं. तसेच ग्रामविकासमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री नाहीत, असं नमूद केलं.

यावर मंत्री शंभुराजे देसाईंनी आदिवासी विकासमंत्री आता होते, असं म्हटलं. यावर अजित पवारांनी संतापून “अरे आत्ता होते काय, तिथं बसायला पाहिजे,” अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली. काय शंभुराजे, तुम्ही नवीनच असल्यासारखं करत आहात, असं म्हणत पवारांनी शंभुराजे देसाई यांना टोला लगावला. अध्यक्षांनी मंत्र्यांना बोलावून घ्यावं. हे बरोबर नाही, असंही पवारांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar get angry on shambhuraje desai over minister absence in assembly session pbs