राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बुधवारी (१५ मार्च) सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाच्या मंत्र्यांवर प्रचंड संतापले. लक्षवेधी मांडण्यासाठी मंत्री वाट पाहत असूनही सरकारचे सहा मंत्री गैरहजर होते, हा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी या मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना आम्ही अध्यक्षांना रात्री येऊन विनंती केली की १० वाजेपर्यंत चर्चा घ्या. अध्यक्षांनी लगेच ही मागणी मान्य केली. ही चर्चा १० वाजेपर्यंत नाही, तर १ वाजून ३ मिनिटापर्यंत काम चाललं. त्यात अध्यक्षांचं सहकार्य मिळालं. ती चर्चा सुरू असताना काहीवेळा मंत्री हजर नव्हते. ते बाहेर जात होते. एखादा मंत्री बाहेर गेला तर सभागृह लगेच थांबवावं लागतं, तरीही ते वॉशरुमला, पाणी प्यायला, चहा घ्यायला गेले असतील असं म्हणत समजून घेतलं.”

“मी माझी फुशारकी सांगत नाही”

“आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा सकाळी ९ वाजता इथं येऊन बसायचो. मी माझी फुशारकी सांगत नाही. परंतु, आम्हीही गेली ३०-३२ वर्षे या सभागृहाची परंपरा कशी चालत आली आहे ते पाहतो. आमच्यानंतरही बाकीच्यांनी ही परंपरा राखली पाहिजे. महाराष्ट्र या विधिमंडळाकडे पाहत असतो,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“चंद्रकांत पाटलांवर माझा आरोप नाही, मात्र त्यांनी…”

“आज सकाळी साडेनऊ वाजता कामकाज सुरू झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जास्त व्याप असतो याची मला जाणीव आहे. ते नसले तरी किमान संसदीय कामकाज मंत्र्यांनी तरी सकाळी साडेनऊ वाजता येऊन बसलं पाहिजे. चंद्रकांत पाटलांवर माझा आरोप नाही, मात्र त्यांनी जबाबदारी घेतली आहे, तर त्यांनी सभागृहात येऊन बसावं,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

हेही वाचा : राष्ट्रवादीनेच जुनी पेन्शन बंद केली असं म्हणताच अजित पवार संतापले; शरद पवारांचं नाव घेत म्हणाले, “अरे बाबा…”

व्हिडीओ पाहा :

“यांना जनाची नाही, तर किमान मनाचीही वाटत नाही का?”

अजित पवार पुढे म्हणाले, “आज सभागृहात केवळ मंगलप्रभात लोढांची लक्षवेधी झाली. सहा मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? अशाप्रकारचे शब्द वापरताना आम्हालाही वाईट वाटतं. काल रात्री एक-दीड वाजेपर्यंत लोक बसली. सकाळी ज्यांची लक्षवेधी होती ते दोन्हीकडील आमदार आले आणि मंत्रीच उपस्थित नाही. मंत्र्यांना असं काय काम आहे?”

“आम्हाला मंत्री करा म्हणून मागेमागे पळता आणि मंत्री झाल्यावर…”

“या मंत्र्यांना मंत्री करताना मागेमागे पळता. हे मी म्हणत नाही, सकाळी कालीदास कोळंबकरांनी सांगितलं. हे मंत्री होण्यासाठी पुढे-पुढे जातात, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगतात आणि मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाहीत आणि दिलेलं वैधानिक काम करत नाहीत,” अशी तक्रार अजित पवारांनी केली.

हेही वाचा : VIDEO: “…म्हणून भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत”, अजित पवारांचा मोठा दावा

“देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो, पण त्यांचंही…”

“देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो. त्यांना उच्चविद्याविभूषित अशी नावं दिली आहेत, पण त्यांचंही लक्ष नाही. त्यांनी त्यांच्या काही मंत्र्यांना सांगावं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांना सकाळी लवकर येण्याची अडचण आम्ही समजून घेतो. मात्र, चंद्रकांत पाटील रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी सकाळी लवकर उठून आलं पाहिजे. संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar get angry over shinde fadnavis government minister in maharashtra assembly session pbs