ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या एका ट्वीटवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांनी मंत्री दादा भुसेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटवर दादा भुसेंनी आज विधानसभेत निवेदन सादर केलं. मात्र, हे निवेदन सादर करताना दादा भुसेंनी केलेल्या एका उल्लेखावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावरून संतप्त प्रतिक्रिया देत थेट दादा भुसेंना सुनावलं.
नेमकं घडलं काय?
संजय राऊतांनी दादा भुसेंवर गिरणा अॅग्रोच्या नावाने लूट केल्याचा आरोप केला. “हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल“, असं राऊत ट्वीटमध्ये म्हणाले. त्यावर निवेदन देताना दादा भुसेंनी थेट शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे विरोधक संतप्त झाले.
दादा भुसेंच्या याच निवेदनावरून झाली खडाजंगी!
“जर मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचा नव्हे, राजकारणातून निवृत्त होईन. यात खोटं आढळून आलं, तर आमच्याच मतांवर निवडून आलेल्या या महागद्दारानेही राज्यसभेच्या खासदारकीचा, सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा द्यावा. हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, माननीय शरद पवारांची करतात. आणि हे आम्हाला शिकवतात. २६ तारखेपर्यंत जर त्यांनी माफी मागितली नाही, तर मालेगावचे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत”, असं दादा भुसे म्हणाले.
अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, दादा भुसेंच्या वक्तव्यावरून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात करताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. “प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भुसेंनी त्यांची भूमिका मांडत असताना आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचं काडीचंही कारण नव्हतं. शरद पवार ५५ वर्षं समाजकारण-राजकारण करतात. नरेंद्र मोदींनीही शरद पवारांविषयी काय म्हटलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना दादाजी भुसे, तुमच्याकडून तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाहीतर आम्हाला वॉकआऊट करावं लागेल”, असा इशाराच अजित पवारांनी दिला.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर दोन्ही बाजूंनी आक्रमक प्रतिक्रिया आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी “दादा भुसेंचं निवेदन तपासून त्यात काही चुकीचं असेल तर ते आजच्या दिवसाचं कामकाज संपण्यापूर्वी कामकाजातून काढून टाकेन”, असं जाहीर केलं.
शंभूराज देसाई यांचंही संजय राऊतांवर टीकास्र!
या सर्व प्रकरणावर बोलताना मंत्री शंबूराज देसाई यांनी विरोधकांवर आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला. “शरद पवारांविषयी संपूर्ण देशाला आदर आहे. आमच्या मतांवर संजय राऊत निवडून आले. आम्हाला ते डुक्कर, गटारातलं पाणी, प्रेतं म्हणाले. हे या सभागृहातल्या सदस्यांविषयी बोललं जातं. दादा भुसेंनी शरद पवारांविषयी अनुद्गार काढलेले नाहीत. हा महागद्दार, जो आमच्या मतांवर निवडून आलाय, त्याला आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. शरद पवारांचा अपमान करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही”, असं शंभूराज देसाई म्हणाले.