मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने जानेवारी महिन्यापासून विविध समाज घटकांचे मेळावे घेण्यावर भर दिला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विविध समूह घटकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला, युवक, अल्पसंख्याक, विद्यार्थी, मागासवर्गीय घटक इत्यादी घटकांत पक्षाला लोकप्रिय करण्यासाठी पक्षाचे शिर्षस्थ नेते, पदाधिकारी उतरले असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह‘ यांचा न्यायालयात संघर्ष होऊन ते अजित पवार गटाला मिळाले असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आहेत, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये असल्याचे चित्र अजित पवार गटाला माहीत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त समाज घटकांमध्ये जाऊन आपली भूमिका आणि जनतेसाठी काम करत असल्याचा संदेश पोहोचविण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा – पश्चिम उत्तर प्रदेशात राहुल गांधी पुन्हा यात्रा काढणार, परंतु RLD च्या बालेकिल्ल्यांना हादरा बसणार का?

अजित पवार गटाच्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुंबईत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यानंतर लगेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुंबईत ‘नारी शक्ती’ मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्यभरातून सुमारे दोन हजारांच्या आसपास महिला कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांना मुंबईत आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षाची महिला आघाडी बळकट करण्याचे घोषित करून महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या ‘शक्ती विधेयकावर’ राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयात पाठपुरावा करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना केले होते.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने ‘युवा मिशन मेळावा’ पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित केला होता. या मेळाव्यास अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. तर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. राज्यातील युवकांना यानिमित्ताने अजित पवार गटाने साद घातली.

हेही वाचा – नगरमध्ये निवडणुकीपूर्वी पाणी प्रकल्पावरून राजकीय वादाची चिन्हे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नवी मुंबईत अल्पसंख्याक विश्वास मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात भाजपसोबत जाण्याची भूमिका खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली. शुक्रवारी परभणी येथे राज्यस्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे तर छत्रपती संभाजी नगर येथे सामाजिक न्याय सेलचा मेळावा आयोजित केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar group emphasis on gaining the trust of various group elements print politics news ssb
Show comments