लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देण्यास भाजपकडून स्पष्टपणे नकार देण्यात आला. राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. मात्र अजित पवार गटाचा कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रह कायम राहिल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारमध्ये पक्षाला स्थान मिळालेले नाही. नजिकच्या काळात अजित पवार गट केंद्रात सहभागी होण्याबाबतही साशंकता आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील महत्त्वाच्या घटक पक्षांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. लोकसभेत एक आणि राज्यसभेत एक असे दोनच खासदार असलेल्या राष्ट्रवादीला एक राज्यमंत्रीपद (स्वतंत्र कार्यभार) देण्याची तयारी भाजपने दर्शविली. राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली जाणार होती. मात्र ते काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्याने आता राज्यमंत्रीपद स्वीकारणे योग्य ठरणार नसल्याचे पटेल यांचे म्हणणे होते. एकच खासदार निवडून आलेल्या जतिनराम मांजी यांना लावलेला न्याय राष्ट्रवादीबाबत लावण्यात आला नाही. बंड केल्यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वर्चस्वाला शह द्यावा अशी भाजप नेतृत्वाची अपेक्षा होती. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले. याउलट अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला. ते बारामतीची जागाही जिंकू शकले नाहीत. यामुळेच कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाचा आग्रह भाजपने मान्य केला नसल्याची माहिती आहे. यात राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. या घडामोडींमधून भाजप अजित पवार यांना फारसे महत्त्व देत नाही हेच स्पष्ट झाले.

हेही वाचा >>>एमएचटी सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, निकाल जाहीर करण्यास विलंब

आम्ही अमित शहा, जे. पी. नड्डा व राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिली. तरीही कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी मान्य झाली नाही. आमचे आणखी दोन खासदार लवकरच राज्यसभेवर निवडून येणार आहेत. त्यावेळी आमचे संख्याबळ वाढेल.-अजित पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार देण्यात येणार होते. पण प्रफुल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद भूषविल्याने त्यांनी राज्यमंत्रिपद नाकारले. आघाडीच्या राजकारणात सर्वांना सामावून घ्यावे लागते. एका पक्षासाठी निकषात बदल करता येत नाहीत.- देवेंद्र फडणवीस, नेते, भाजप