मुंबई : मंत्रिपद नाकारल्यानंतर थयथयाट करणारे छगन भुजबळ आणि बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात वादग्रस्त ठरलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे या दोघांचा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या गाभा (कोअर) समितीत समावेश केला आहे. पवारांच्या या निर्णयाने पक्षाचे अन्य नेते मात्र आवाक् झाले आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर दररोज होणाऱ्या आरोपांमुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची चर्चा होती. त्यावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत होती. परंतु अशा वादग्रस्त प्रतिमा झालेल्या मुंडे यांना पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात प्रवेश देऊन अजित पवारांनी त्यांचे पक्षातील स्थान अधिक भक्कम केले आहे. पवारांनी दिलेेले अभय व पक्षातील नवी नेमणूक लक्षात घेता मुंडे यांच्यावरील गंडांतरही टळल्याचे मानले जात आहे.

मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळ यांनी थेट अजित पवार यांनाच लक्ष्य केले होते. त्यातच गेले काही दिवस भुजबळ पक्षाच्या बैठकांकडे फिरकत नव्हते. शिर्डीतील पक्षाच्या अधिवेशनाला त्यांनी काही वेळ हजेरी लावली, पण भाषणात अजित पवारांना त्यांनी लक्ष्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु मुंडेंप्रमाणे भुजबळ यांचाही पक्षाच्या गाभा समितीत समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

समितीतील अन्य नेते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय ‘गाभा’ समितीत प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदींचा समावेश आहे.

पालकमंत्रिपदही सोपवणार?

धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या गाभा समितीत समावेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांना ज्या पद्धतीने अभय दिले जात आहे, त्यावरून बीड प्रकरणातील धुरळा खाली बसताच त्यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपदही सोपविले जाऊ शकते, अशी चर्चा पक्षात रंगली आहे.

Story img Loader