विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे, या भेटीनंतर तरी तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यापालांसोबत भेट झाल्यावर माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, “गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची वेळ मागितली होती. मात्र त्यावेळेस राज्यपालांना बाहेर जायचे असल्यामुळे भेटता आले नाही. त्यांनी आजची वेळ आम्हाला दिली होती. आज आम्ही राज्यातील सध्याची परिस्थिती राज्यपालांना सांगितली. पावसामुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठवाडा, जळगाव, कन्नडमधील परिस्थितीची राज्यपालांना माहिती दिली. यासोबत विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा ठराव कॅबिनेटने केला होता. परंतु त्यापुढची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे राज्यपालांना विनंती करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे आलो होतो. कॅबिनेटने शिफारस केलेल्या १२ आमदारांबाबत लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल. याबाबत योग्य निर्णय घेण्याचे राज्यपालांनी सांगितले.”
६ नोव्हेंबर २०२० ला नवाब मलिक, अनिल परब आणि अमित देशमुख यांनी १२ नावे राज्यपाल यांना भेटून सुपूर्त केली होती. तर त्याच्या दोन आठवडे आधी २९ ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ नावे मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती.
हेही वाचा – “हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”, भुजबळांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर
काँग्रेसकडून
१) सचिन सावंत
२) रजनी पाटील
३) मुजफ्फर हुसैन
४) अनिरुद्ध वणगे – कला
राष्ट्रवादी काँग्रेसकडून
१) एकनाथ खडसे<br />२) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे – साहित्य
४) आनंद शिंदे – कला
शिवसेना उमेदवार
१)उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील
३) विजय करंजकर
४) चंद्रकांत रघुवंशी