महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे. मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी ३१ मे रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. याचदरम्यान ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलीय. राज यांना पुन्हा करोनाची लागण झाल्याच्या याच मुद्द्यावरुन आज मुंबईमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वक्तव्य केलंय. मास्क घालणं महत्वाचं का आहे याबद्दल भाष्य करताना अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे राज यांना दुसऱ्यांदा करोना झाल्याचा उल्लेख केला.
नक्की वाचा >> “अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा, बुद्धीमान माणसा…”; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सांगितलं. “मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यांमध्ये काय चाललंय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललंय हे आम्हाला सांगतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पहायला मिळालं की करोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
पुढे बोलताना, “डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा घेतला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, “आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणं बंधनकारक केलं पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु,” असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी हिंदीमधून वेगवगेळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिल्या. पत्रकार परिषद संपण्याच्या आधी एका मराठी महिला पत्रकाराने मास्क बंधनकारक करण्यावरुन पुन्हा अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी काही राजकारण्यांना मास्क न घातल्याने पुन्हा करोनाची लागण झाल्याचा उल्लेख केला.
मास्क बंधनकारक करण्याचा विचार केला जातोय का? असं विचारलं असता अजित पवार यांनी, “विचार करावाच लागेल. तुम्हाला करोना झाला तर आम्हाला कोण प्रश्न विचारणार,” असं उत्तर दिलं असता सर्व पत्रकार हसू लागले. पुढे बोलताना अजित पवार यांनी, “सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघा काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला,” असं म्हटलं. अजित पवार यांच्या वक्तव्याचा रोख राज ठाकरेंच्या दिशेने होता.
“ऑप्रेशन करायला गेले आणि करोना झाला. आता गेले ना दिवस वाया गेले की नाही? असं होवू नये. प्रत्येकाचा एक एक दिवस, एक एक मिनीट, एक एक तास, एक एक सेकंद महत्वाचा असतो. त्यामुळेच ज्यांना कुणाला वापरता येईल त्यांनी वापरावं मास्क,” असं अजित पवार यांनी म्हटलं. “मी आणि मुख्यमंत्री जेवढं मास्क वापरणं शक्य आहे तेवढं वापरण्याचा प्रयत्न करतो. कारण उद्या आम्ही सांगत असताना आपणच नाही वापरलं तर लोक, म्हणतील ए शहाण्या तूच वापरता नाही आम्हाला काय सांगतो. त्यामुळे कोणी आम्हाला सांगू पण नये की तुम्ही आधी वापरा आणि मग सांगा, म्हणून आम्ही मास्क वापरतो,” असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.