बारामतीत मुलीची छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी तिच्या वडिलांचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी आरोपीने “घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है”, असं स्टेटस ठेऊन हत्या केल्याचं नमूद केलं. तसेच अशा अल्पवयीन आरोपांविरोधात कठोर कारवाईसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. ते सोमवारी (२२ ऑगस्ट) विधीमंडळ अधिवेशनात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “१७ ऑगस्टला विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आणि १८ ऑगस्टला बारामतीत शशिकांत नानासाहेब कारंडे यांची मुलीला शाळेतून आणायला गेले असताना दोन तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. ते मुलीसमोरच रक्ताच्या थारोळात पडले. हे अतिशय भयानक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गोष्टी गांभीर्याने घेतली पाहिजे.”
“न्यायालयाने सोडून दिलं त्याच मुलाने मुलीच्या वडिलांचा खून केला”
“याच अल्पवयीन मुलाने याआधीही अशाचप्रकारे मुलीला त्रास दिला होता. तेव्हा तो १७ वर्षांखालील म्हणजेच अल्पवयीन आहे म्हणून पोलिसांनी त्याला केवळ बोलावलं आणि वादाबाबत बालन्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानेही त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यावर मुलीचे वडील शशिकांत कारंडे यांनी या मुलाला असं करू नको म्हणून समजावलं. परंतु, नंतर पुन्हा काही गोष्टी घडल्या आणि या मुलाने थेट त्या व्यक्तीचा खून केला,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है”
अजित पवार पुढे म्हणाले, “या गोष्टीच्या खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की, संपूर्ण महाराष्ट्रात या अल्पवयीन मुलांमध्ये हे संघर्ष होत आहेत. आरोपीने हत्येपूर्वी व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर ‘घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है’ असं स्टेटस ठेवलं आणि मग हत्या केली. राज्यात अल्पवयीन मुलांवर वाढत्या सोशल मीडियाचा दुष्परिणाम होत आहे.”
हेही वाचा : “५० खोके, माजलेत बोके, एकदम ओके”, पवार-दानवेंच्या नेतृत्वात विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी
“अल्पवयीन मुलांना सोडून न देता कडक कारवाई करावी”
“व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवणं, इंस्टाग्राम, फेसबूक इत्यादी सोशल मीडियाचा वापर वाढल्याने समाजातील अल्पवयीन मुलांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांनी देखील गुन्हा केला तर त्यांना बालगृहात पाठवणे किंवा सोडून देणे असं न करता कडक कारवाई करावी लागेल. अन्यथा हे लहान मुलं आहेत म्हणून दुर्लक्ष केल्यास समाजात वेगळी परिस्थिती निर्माण होईल. हीच घटना १८ ऑगस्टला बारामतीत घडली. त्याची गंभीर दखल घेऊन शासनाने उपाययोजना करावी,” असंही पवारांनी नमूद केलं.