उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांना काय सल्ला द्याल असा प्रश्न केला. यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना बाहेर लक्ष देता तसं आपल्या काकांकडेही लक्ष द्यावं, असा खोचक सल्ला दिला. आता अजित पवारांनी राज ठाकरेंच्या या सल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ते गुरुवारी (२७ एप्रिल) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
राज ठाकरेंनी अजित पवारांना सल्ला देताना बाहेर लक्ष देता तसं काकांकडेही लक्ष द्या, असं म्हटलं. यावर अजित पवारांनीही टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले, “ठीक आहे, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं, तसं मीही माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन.”
राज ठाकरे काय म्हणाले होते?
अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मला ५ तारखेच्या माझ्या रत्नागिरीतील सभेत सविस्तर बोलायचं आहे. एका वाक्यात बोलायचं नाही, पण अजित पवार बाहेर जेवढं लक्ष देत आहेत तेवढंच त्यांनी काकांकडेही लक्ष द्यावं.”
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं म्हटले. याबाबत अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी अमोल कोल्हेंच्या म्हणण्याला शुभेच्छा असं एका वाक्यात उत्तर दिलं.
हेही वाचा : “…म्हणून माझी जिरवू नका”, ‘त्या’ निवडणुकीबाबत अजित पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
शरद पवारांचं ते वक्तव्य म्हणजे कोणत्या बदलाचे संकेत? अजित पवार म्हणाले…
शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं. हे काही बदलाचे संकेत आहेत का? अशी विचारणा केल्यावर अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी गेल्या ५५-६० वर्षांच्या राजकीय जीवनात काही प्रसंग लक्षात घेऊन अनेकदा भाकरी फिरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नवे लोक पुढे आले आहेत, हे सर्वांनी पाहिलं आहे.”
“आम्ही चाळीशीत असताना शरद पवारांनी मला, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी दिली. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आम्ही आमचं काम दाखवू शकलो. जसं सगळ्यांना वाटतं की मला प्रमोशन मिळावं तसं नव्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. माझीही तीच इच्छा आहे की, आमदारकी-खासदारकीत काही नवे चेहरे आले पाहिजे,” असं अजित पवारांनी नमूद केलं.