संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आजजाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा – गुजरातमध्ये भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे घोडदौड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “काँग्रेसला केवळ…”
काय म्हणाले अजित पवार?
“गुजरातमध्ये निकाल साधारण एक्झिट पोलनुसार पाहायला मिळाले आहेत. मात्र, अद्यापही स्पष्ट निकाल हाती आलेले नाहीत. गुजरातमध्ये आप आणि काँग्रेस हे दोघे वेगवेगळे लढले. त्यांच्या मतांची टक्केवारी स्पष्ट झाल्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल. ज्यावेळी आप गुजरातमध्ये निवडणूक लढणार, हे निश्चित झाले होते, तेव्हा आपमुळे काँग्रेसला फटका बसेल, असं राजकीय विश्लेषक सांगितले होते. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, त्याप्रकारे निकाल आले आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
“याचबरोबर हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि काल दिल्लीत आपने भाजपाचा पराभव केला आहे. अशा प्रकारे संमिश्र निकाल लागले आहेत. मात्र, तुम्ही पोटनिवडणुकीचा विचार केला, तर तिथे आताच्या सत्ताधारी पक्षाला यश मिळालेलं नाही”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – गुजरातमधील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पोकळ आश्वासने अन् रेवडी…”
पुढे बोलताना, “ ”सुरुवातीला हार्दिक पटेल पराभूत होईल, अशी परिस्थिती होती. पाचवर्षांपूर्वी हार्दिकने स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, त्याने पक्ष बदलल्यानंतर त्याला लोकांनी फारसा प्रतिसाद दिला आहे, असं वाटत नाही. मात्र, एकंदरीतच निवडणूक आयोगाकडून आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर याबाबात विश्लेषण करता येईल.लोकशाहीत यश-अपयश येत असतं, जे निवडून आले आहेत, त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि जे पराभूत झाले आहे, त्यांनी खचून जाऊ नये, एवढाच सल्ला देतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.