उद्यापासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र लिहिलं दिलं आहे. या पत्रात त्यांनी मनुस्मृतीचा मुद्दा उपस्थित करत याबाबत सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लक्ष्य केलं असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक अशा मुद्द्यांचं राजकारण केलं जातं आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सरकारकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. अजित पवार यांनी मनुस्मृतीच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.
हेही वाचा – राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी आज सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्राची सुरुवात त्यांनी मनुस्मृतीच्या मुद्द्याने केली आहे. यापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. केवळ खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
“मनुस्मृतीला महाराष्ट्रात स्थान नाही”
पुढे बोलताना त्यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील कोणताही श्लोकाचा समावेश करण्यात आलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलं. राज्यात अशा प्रकारे कोणताही प्रयत्न केला जाऊ शकत नाही. मनुस्मृतीला राज्य सरकारचं समर्थन नाही. मनुस्मृतीसारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान नाही, हे विरोधकांना माहिती आहे, तरीही विरोधकांकडून अशा प्रकारे मुद्दे उपस्थित करून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले. अशा प्रकारे राजकारण करणं योग्य नाही, ते महाराष्ट्राला परवडणारंही नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा टोला, खोटं बोलून मतं मिळाल्याने आता विरोधकांनी ठरवलंय की..”
अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या आरोपालाही दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, सरकारकडून अधिवेशन लवकर गुंडाळण्यात येत असल्याच्या आरोपालाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. “जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून कोणतेही अधिवेशन लवकर गुंडाळण्यात आलेलं नाही. अधिवेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं. यादरम्यान, प्रत्येक विधेयकावर किंवा लक्ष्यवेधीवर चर्चा केली जाते आणि त्यामार्फत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जातं”, असे ते म्हणाले.