भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. सोमवारी ( ९ जानेवारी ) नाशिकमध्ये पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गेल्या ४० वर्षात चुलते आणि पुतण्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा निधी यांनी पळवला आहे. शिरुर तालुक्याचा बिबट्यासंदर्भातील १००० हजार कोटींचा निधी बारामतीला नेला. पण, बारामतीत एकही बिबट्या नाही. गेल्या ४० वर्षात यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांचं नुकसान केलं. त्यामुळे आपली वाताहात केली,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “प्रत्येकाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. उपटसुंभ लोकांना उत्तर देण्यास अजित पवार मोकळा नाही. तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही. डिपॉजिट जप्त करुन पाठवलं आहे.”

हेही वाचा : “शरद पवार जाणते नाहीतर नेणता राजा” एकेरी उल्लेख गोपीचंद पडळकरांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीसारख्या कुबड्याची…”

“प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का?”

कृषी प्रदर्शनासाठी शरद पवारांनी पैसे घेतले, असा आरोप भाजपाने केल्याचं प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “कृषी प्रदर्शन होतं असताना शरद पवारांनी पैसे मागितले, असं सांगणारा एक शेतकरी उभा करा, मी राजकारण सोडून देईन. प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का? आव्हान स्वीकारत राजकारणातून निवृत्त व्हायचं. भारताला स्वयंपूर्ण करण्यात काम शरद पवारांनी केलं. त्याची नोंद जगाने घेतली,” असेही अजित पवार म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reply gopichand padalkar over sharad pawar and ajit pawar attacks ssa