मुंबई: राज्यातील विकास प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. पुणे मेट्रो क्रमांक ३ च्या कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय, टाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी चतुर्थ श्रेणी पदे मंजूर नसल्यास ती तत्काळ मंजूर करावीत.
हेही वाचा >>> ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३४५ कोटी रुपये थकविले; राज्यातील १७ साखर कारखान्यांविरोधात सरकारची कारवाई
अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा देखील पवार यांनी घेतला.