राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी सभागृहात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली. “एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांना जवळ करावं, नाही तर त्यांचं काही खरं नाही,” असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी नार्वेकर ज्या ज्या पक्षात गेले तेथे त्यांनी त्या पक्षाच्या नेतृत्वाला आपलंसं केल्याचंही नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितलं मी उमेदवार होईन पण मला अपयश आलं तर मला कुठं तरी सदस्य केलं गेलं पाहिजे. तेव्हा त्यांना विधान परिषदेचं सदस्यपद मिळालं. तेथे त्यांनी उत्तम काम केलं. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केलं. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.”
“नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळ जातात”
“मला एका गोष्टीचं खूप कौतुक आहे. राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या खूप जवळ जातात. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना आपलसं केलं. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलंसं केलं. आता भाजपात गेल्यावर देवेंद्र फडणवीसांना आपलंसं करून टाकलं. त्यांनी कुठलीच हयगय केली नाही. आता एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं. नाहीतर त्यांचं काही खरं नाही,” असा सूचक सल्ला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना दिला.
“भाजपाच्या जुन्या नेत्यांना जे जमलं नाही, ते नार्वेकरांनी ३ वर्षात करून दाखवलं”
अजित पवार पुढे म्हणाले, “भाजपातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसाठी देखील एक आश्चर्यकारक बाब आहे. बरेच नेते अनेक वर्षे काम करत आहेत. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना जे जमलं नाही ते राहुल नार्वेकर यांनी ३ वर्षात करून दाखवलं. हा कौतुकाचा भाग आहे.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “मला एका गोष्टीचं खूप कौतुक, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर…”; अजित पवारांच्या टोलेबाजीवर एकच हशा
“मी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुचवलं होतं”
“मी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुचवलं होतं. म्हटलं काय बडबड करायची ती तिथं बसून करावी. किती तास, किती मिनिटं, किती सेकंद, किती वर्ष सगळं सागू द्यावं,” असं म्हणत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला. तसेच यानंतर मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या असंही म्हटलं.