आज (१ ऑगस्ट) मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या तिन्ही पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपासह अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. यावेळी अजित पवार भाषण करायला उभे राहताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमातून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.
भर कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस अचानक उठून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र, अजित पवारांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस उठून का गेले? याचं नेमकं कारण समोर आलं आहे. याबाबतचा खुलासा स्वत: फडणवीसांनी केला. अजित पवारांच्या भाषणादरम्यान निघून गेलेले फडणवीस काही मिनिटांनी पुन्हा कार्यक्रमात आले. यानंतर संबंधित कार्यक्रमातून केलेल्या भाषणातून फडणवीसांनी याबाबतचा खुलासा केला.
हेही वाचा- “देवेंद्र फडणवीसांनी भाजपाला अडचणीत आणलं, त्यांची दुकानदारी…”, सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी मगाशी काही कारणांमुळे कार्यक्रमातून उठून गेलो होतो. त्याचं स्पष्टीकरण देतो. कारण अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांना जेव्हा बातमी मिळत नाही. तेव्हा ते बातमी तयार करतात. त्यामुळे अजित पवार बोलायला उभे राहिले आणि फडणवीस निघून गेले, अशा प्रकारची बातमी तयार होऊ नये म्हणून मी आधीच स्पष्टीकरण देतो.”
हेही वाचा- “अजित पवारांचे सर्व अधिकार काढून…”, फडणवीसांच्या नियंत्रणाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान
“नौदलाचे प्रमुख महाराष्ट्रात आले होते. संरक्षण उत्पादन (Defence Manufacturing) संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना वेळ मागितली होती. नेमकं साडेतीन वाजता त्यांनी वेळ दिला. त्यामुळे मी १५ मिनिटं कार्यक्रम सोडून त्यांची भेट घ्यायला गेलो आणि परत याठिकाणी आलो,” असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हेही वाचा- ‘इंडिया’कडून केंद्रीय समन्वय समितीची घोषणा; ‘या’ नेत्यांचा समावेश, संपूर्ण यादी
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “खरं तर, आताच्या परिस्थितीत आपल्या विरोधकांच्या माध्यमातून एकच गोष्ट सुरू आहे. If you can’t convince them, confuse them. (जर तुम्ही एखाद्याला पटवून देऊ शकत नसाल, तर त्यांना गोंधळात टाका) याच्या माध्यमातून विसंवाद तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुठेतरी वाद आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यांनी एक गोष्ट निश्चितपणे समजून घेतली पाहिजे, भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी आणि आमचे सगळे मित्रपक्ष, हे ‘फेव्हिकॉल’ का जोड आहे.”