मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळी कोळीवाड्यातील नागरिकांतर्फे (दि. ७ फेब्रुवारी) जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री भाषण करत असताना काही लोक उठून जात असल्याचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला होता. या सभेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर देत या सभेची खिल्ली उडवली. अजित पवार म्हणाले, “वरळीमध्ये जंगी सभा झाली, भव्य सभा झाली. मी पण पाहिली, माध्यमांनी पण दाखवली. सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा झाली. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत.”
महाराष्ट्राच्या लोकांना रडीचा डाव आवडत नाही
आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करताना अजित पवार म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. मविआचा विद्यमान आमदार असल्यामुळे म्हात्रेंना शिवसेनेकडून तिकीट मिळू शकले नाही. नाहीतर तोही निकाल आमच्याबाजूने लागला असता. आदित्य ठाकरे त्याच्यापद्धतीने काम करत आहे, काहींना बघवत नाही. सत्ता मिळाल्यानंतर हुरळून न जाता लोकांसाठी काम करायचे असते, असा रडीचा डाव खेळायचा नसतो. महाराष्ट्रातील लोकांना हा रडीचा डाव आवडत नाही. जे कुणी असे करत आहेत, त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आमच्या पक्षातील लोकांनी देखील असे केले तरी त्याचे समर्थन मी करणार नाही.
हे वाचा >> “लावणीच्या नावावर अश्लील नृत्य नको, वेळ पडली तर…”, अजित पवार यांचं मोठं विधान
“विरोधक असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, कोणत्याही पक्षाचे नेते राज्यात फिरत असताना आदर दिला पाहीजे. विचारधारा वेगळी असू शकते, विचारांचा सामना विचारांनी करावा. पण हे दगडं मारणं, शाई फेकणं किंवा हिंसा करणं अयोग्य आहे. अहिंसेच्या मार्गाने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीच करु नये”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
महिलां भगिनींनी ही गोष्ट लक्षात ठेवावीच
यावेळी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मी हा मुद्दा अनेकवेळा मांडला आहे. जाहीर सभेत याबाबत बोललो आहे. मंत्रीमंडळात महिलांना स्थान द्या, असंही मी सांगितलं आहे. मात्र, हे सरकार महिलांचा अपमान करत आहे. यामुळे महिला भगिनींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि पुढच्या निवडणुकीला विचार करूनच मतदानाचं बटन दाबावं, अशी गमतीशीर प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.