राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी राज्यात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्गा आणि त्यासाठी घेण्यात घेणाऱ्या काळजीबाबत थेट विधीमंडळ सदस्यांनाच ऐकवलं. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन एवढं सांगूनही देवेंद्र फडणवीस मास्क घालत नसल्याचं सांगितलं. तसेच नवाब मलिक आणि गणेश नाईक यांचाही उल्लेख करत निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “देशाने आणि राज्याने दुसऱ्या करोना लाटेची खूप मोठी किंमत मोजलेली आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघुयात. काल मी एवढं सांगितलं तरी देखील देवेंद्र फडणवीस मास्क लावत नाहीत. गणेश नाईक मास्क लावत नाही. नाईक यांना मी वयाचा विचार करून विनंती करतो. तुमचे माझे संबंध कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. नवाब मलिक तर कुठलंच बोलताना आमचं ऐकत नाहीत. आता करायचं काय?”

“सभागृहात मास्क न वापरणाऱ्या आमदारांना अजित पवारांनी सुनावलं”

दरम्यान, गुरुवारीच (२३ डिसेंबर) अजित पवार यांनी राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजादरम्यान मास्क न वापरणाऱ्या आमदारांना खडे बोल सुनावले होते. करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मास्कचं महत्व पटवून देताना अजित पवार यांनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन करोना परिस्थितीसंदर्भात किती गांभीर्याने विचार करतायत याचा दाखल देत विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेखही केला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकावणाऱ्याला कर्नाटकमधून अटक करण्यात आल्याच्या मुद्द्यावरील चर्चा झाल्यानंतर अजित पवार त्यांच्या आसनावरुन उठले आणि पिठासीन अध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्या परवानगीने बोलू लागले. “आपल्यामार्फत मला सभागृहाचं लक्ष एका विषयाकडे वेधायचं आहे. कालपासून अधिवेशन सुरु झालं आज दुसरा दिवस आहे. आपण तीन, चार, पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननिय सदस्य करतायत. स्वत: देशाचे पंतप्रधान देखील जो काय सध्या करोनासंदर्भातील संकट आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करतायत. त्यामध्ये रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देश पातळीवर सुरु आहे. काही ठराविक सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही,” असं मत अजित पवारांनी मास्क न लावणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

“संपूर्ण महाराष्ट्र इथं काय सुरु आहे ते बघतोय. आम्हीच (लोकप्रतिनिधी असून) कुणी मास्क लावत नसू तर कसं होणार? ठिक आहे, काही जणांना मास्क काढल्याशिवाय त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडता येत नसतील. पण बोलून झाल्यावर तरी मास्क घातला पाहिजे ना?,” असंही अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी बोलेन पण…”; फडणवीसांनी सभागृहात दिला शब्द

अजित पवार यांनी परदेशातील परिस्थितीचा संदर्भाही दिला. “एवढी वाईट परिस्थिती आहे ज्याचा अंदाज नाहीय अध्यक्ष मोहोदय आपल्याला. परदेशात दिड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या होत चाललीय. जागतिक आरोग्य संघटनेनं परदेशामध्ये पाच लाख लोक मृत्यूमुखी पडतील असं सांगितलं आहे. हे झालं परदेशाचं आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं काय?,” असा प्रश्न मास्क न घालणाऱ्या विधानसभा सदस्यांना अजित पवारांनी विचारला.

नक्की वाचा >> अनिल परब विरुद्ध नितेश राणे… जागेवरुन विधानसभेच्या सभागृहात वाद, फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी

मास्क घातलं नसेल तर अगदी मलाही बाहेर काढा असंही अजित पवार म्हणाले, “अध्यक्ष मोहोदय काही काही गोष्टींचं गांभीर्य त्या त्यावेळीच लक्षात घेतलं पाहिजे. आपण देखील तिथं बसताना कोणीही मास्क घातलं नसेल तर त्याला बाहेर काढा. अगदी माझ्यासारख्याने मास्क घातलं नसेल तर मलाही बाहेर काढा. कुठंतरी हे गांभीर्याने घ्या. माझी विरोधी पक्षनेते आणि सर्वांनाच विनंती आहे की आपण हे गांभीर्याने घेतलं पाहिजे,” असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar taunt devendra fadnavis over mask amid corona omicron infection pbs