उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाला विधानसभेत आज ( १३ मार्च ) अजित पवारांनी विरोध दर्शवला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ असल्याची टीप्पणी अजित पवारांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांत अर्थसंकल्पाचं वर्णन करायचं असेल तर, ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोणी झाला,’ असं आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे पूर्ण न होणाऱ्या घोषणांचा पाऊस आहे. यातून कोणालाही दिलासा मिळणार नाही, असं माझं मत आहे.”

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांनी समोर आणली मोठी चूक; म्हणाले, “आता…”

“अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, योजना पुढं गेल्या पाहिजेत, याची काळजी अर्थमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. मागील वर्षी ‘पंचसुत्री’च्या आधारावर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंचामृत’ असं नाव दिलं. कुठेही गेले की थोडेसे ‘पंचामृत’ देतात. ते झाल्यावर प्रसाद देतात.”

“म्हणजे आम्हा सर्वांना ‘पंचामृत’ दिलं. एकनाथ शिंदेंच्या गटाला प्रसाद दिला. प्रसादानंतर जेवण असतं, ते भाजपावाल्यांना पोटभरून दिलं आहे. भाजपावाल्यांना महाप्रसाद, एकनाथ शिंदेंना प्रसाद आणि आम्हाला थोडं, थोडं पंचामृत देण्यात आलं,” अशी टोलेबाजी अजित पवारांनी सभागृहात केली.

हेही वाचा : आदित्य ठाकरे विरूद्ध आशिष शेलार, दोन्ही आमदार सभागृहात एकमेकांना भिडले; नेमकं झालं काय?

“देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करता. पण, येथे असं का झालं माहिती नाही. कोणतीही अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आर्थिक धोरणात सातत्य आणि स्पष्टता लागते. तुमच्या आर्थिक धोरणाकडं जगाचं लक्ष असते. परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगतीही अवलंबून असते,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar taunt on devendra fadnavis over assembly budget session 2023 ssa