अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणीस सरकारमध्ये सहभागी का झाले याचा मोठा खुलासा केला आहे. ते रविवारी (२ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त बैठका होत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळ्या राज्यात वेगळी परिस्थिती आहे. देशात कुठं काँग्रेस व ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस, कुठं आप विरुद्ध काँग्रेस, पंजाबमध्येही तसंच आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची बैठक होते तेव्हा त्यातून काहीच साध्य होत नाही.”
व्हिडीओ पाहा :
“…म्हणून आम्ही सर्वांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला”
“आपला एवढा मोठा देश आहे. आता तर जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे देशात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ती गरज असल्यामुळे आम्ही सर्वांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“मी शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला”
“राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं. परंतू शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि मागेही मी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मी माझी स्पष्ट भूमिका मांडली होती. पक्षाची स्थापना झाल्यापासून गेले २४ वर्षे वेगवेगळ्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सर्वजणांना शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि पक्ष इथपर्यंत पोहचला आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.