२०१९ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांना मोठा फटका बसला होता. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) या पक्षाने राज्यात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे. “बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. तेव्हा अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. “उद्याच्या निवडणुकीत बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, हे लक्षात ठेवा. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला आहे. ५ ते १० हजारांच्या मतांनी काठावर निवडून येणारे आमदार आणि खासदार अडचणीत आले.”
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असतं, पण…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
“एका कार्यक्रमानिमित्त प्रकाश आंबेडकरांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बोलावलं होतं. केसीआर यांचं तेलंगणात जेवढं लक्ष नाही, तेवढं महाराष्ट्रात आहे. केसीआर हे आजी, माजी आमदारांना फोन करून संपर्क साधतात. निवडणुकीत कितीही चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न केला, तरी हे बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “रामदास कदम संजय राऊतांना म्हणायचे, मला राष्ट्रावादीत जायचं आहे, त्यासाठी…”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
“समविचारी मतांची विभागणी झाली, तर अडचण निर्माण होते. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. नेत्यांनी कितीही भाषणं केली, जाहीर सांगितलं, तरीदेखील बुथवर हाडाचा कार्यकर्ता उभा राहत नाही, तोपर्यंत फरक पडत नाही. आम्ही दीड-दोन लाख मतांनी निवडून येतो, त्याचं कारण बुथ कमिटी आहे. काही ठिकाणी नगसेवकाला जेवढी मतं मिळतात, तेवढीही मते आपल्या काही उमेदवारांना मते मिळाली नाहीत,” अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली आहे.