मुंबई : शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये करून वादाला निमंत्रण देणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. यापुढे वादग्रस्त विधाने करू नये, असा सज्जड दमच त्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
‘शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, असे विधान कोकाटे यांनी अलीकडेच केले होते. तत्पूर्वी त्यांनी ‘भिकारीही एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत आहोत. तरीही त्याचा गैरवापर केला जातो’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोकाटे यांच्या दोन्ही विधानांवरून बराच गदारोळ झाला. कर्जमाफीच्या विधानावरून विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांनी वातावरण तापविल्यावर कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांसमक्ष कोकाटे यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत दोनदा अशी वादग्रस्त विधाने करण्यात आली. यापुढे अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असे पवार यांनी कोकाटे यांना बजावल्याचे समजते.