मुंबई : काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापूर्वी पक्षातील फूट किंवा चिन्हावरून झालेल्या वादांमध्ये निवडणूक आयोगाने संघटनात्मकाबरोबरच विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेत निकाल दिले आहेत. या आधारे विधिमंडळ पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे संख्याबळ अधिक असल्याने खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच ठरेल व घडय़ाळ चिन्ह मिळेल, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघटनात्मक नियुक्त्या या बेकायदेशीर असल्याचेही पटेल यांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षातील फुटीनंतर १९७२ मध्ये सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या वादात निवडणूक आयोगाने संघटनात्मक तसेच संसद आणि विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेतला होता. विधिमंडळात संख्याबळ अधिक असलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला अधिकृत मान्यता देत बैलजोडी चिन्ह सोपविले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता निवडणूक आयोगाचा आदेश न्यायालयाने वैध ठरविला होता.

२००३ मध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळ या चिन्हावर दावा केला होता. तेव्हाही पक्षातील संघटनात्मक आणि विधिमंडळातील बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या बाजूने निकाल दिला होता. समाजवादी पक्षाबाबतही हाच आधार घेण्यात आला होता याकडे पटेल यांनी लक्ष वेधले. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील कायदेशीर लढाईत निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्याकडे सोपविले होते. या आधारेच महाराष्ट्र, नागालॅण्ड आणि झारखंडमधील बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

विधानसभेतील ५३ पैकी सर्वाधिक ४० पेक्षा अधिक आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. नागालॅण्डमधील सातही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. झारखंडमधील आमदारही आमच्याबरोबर आहेत. निवडणूक आयोगाचे सादिक अलीपासूनचे विविध आदेश आणि सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे विचारात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडय़ाळ चिन्ह अजित पवार अध्यक्ष असलेल्या मुळ पक्षाला मिळेल, असा ठाम दावा पटेल यांनी केला.

नाव आणि चिन्हाबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. तोपर्यंत नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा आदेश लागू होईल, असे पटेल यांचे म्हणणे आहे. शरद पवारांची निवड चुकीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली होती. पक्षाच्या घटनेप्रमाणे कार्यकारी समितीच्या ५६८ सदस्यांनी ही निवड करायची असते. पण समितीमधील ५६८ सदस्य कोण होते याची काहीच माहिती उपलब्ध नाही. पक्षात वाद निर्माण झाल्यानेच हा मुद्दा समोर आल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे.