‘पिण्यासाठी उजव्या-डाव्या कालव्यात पाणी सोडा’, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अजित पवार यांनी अत्यंत असभ्य भाषेत केलेली संभावना तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या आश्वासनाची न केलेली पूर्तता, यामुळे राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांची थट्टा चालविली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
‘पिण्यासाठी उजव्या-डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे’ या मागणीसाठी ५ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. उजव्या-डाव्या कालव्यात पाणी सोडल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील तब्बल सात तालुक्यांमधील १११ गावांना पाणी पुरवठा होणार आहे. तसेच पाणी पुरवठय़ाच्या नावाखाली टँकर लॉबी तयार करून पैसे लाटण्याच्या प्रक्रियेलाही आळा बसणार आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांची असभ्य आणि असंस्कृत भाषेत खिल्ली उडविल्याने अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. उजव्या-डाव्या कालव्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याच शेतकऱ्यांना पाणी देण्याची वेळ आल्यानंतर अजित पवारांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे, असे एका वृध्द शेतकऱ्यांने सांगितले.  
शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन ‘टीएमसी’ पाणी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले होते. पण अद्याप पाणी सोडले गेले नसल्याने मुख्यमंत्र्यांनीही दिशाभूल केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
बेजबाबदार आणि संस्कारहीन वक्तव्य-प्रभाकर देशमुख
अजित पवार यांनी माझे नाव घेऊन अत्यंत गलिच्छ आणि असभ्य शब्दात केलेले वक्तव्य हे बेजबाबदार आणि संस्कारहीन आहे. दुष्काळग्रस्तांच्या बाबतीत यांच्या मनात किती संवेदना आहे, त्याचाच प्रत्यय सर्वाना आला. लोकशाहीच्या माध्यमातून निषेध करण्यासही ते पात्र नसल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. (प्रभाकर देशमुख यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive  येथे भेट द्या)