राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही भारतीय संविधानातील तरतुदीनुसार वैध असल्याचा निर्वाळा देत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विरोधकांच्या चक्रव्यूहातून पवार यांची सुटका केली.
 उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा सदनाला परिचय करून देण्याच्या प्रस्तावास विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी जोरदार विरोध केला होता. शिवसेना-मनसेनेही खडसेंना पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद हे घटनेत नाही त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेली शपथच बेकायदेशीर ठरते असा आरोप केला होता. त्यावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ सदनाबाहेरची बाब आहे. राज्यपालांच्या अनुमतीने शपथविधी झाला आहे. सदनातही कायदेशीर बाबींचा उहापोह झाला असून या सर्व बाबींचा विचार करावा लागेल असे सांगत या विषयावरील निर्णय अध्यक्षांनी काल राखून ठेवला होता. त्यावर निवाडा देताना एखाद्या मंत्र्याला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देणे हे घटनेतील तरतूदीनुसार वैध असून त्या मंत्र्याला उपमुख्यमंत्री संबोधणे हे वर्णनात्मक आहे आणि सर्व प्रयोजनासाठी ते मंत्री म्हणून समजले जातील, त्यामुळे पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद कायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. वळसे पाटील यांच्या या निर्वाळ्यामुळे दोन दिवस सुरू असलेल्या या वादावर पडदा टाकला.    

Story img Loader