पहिल्याच बैठकीत गृह खात्याला निधी देण्याचे आश्वासन
तब्बल ७२ दिवसांच्या विजनवासातून मंत्रिमंडळात परतलेले आणि १७ दिवस बिनखात्याचे मंत्री राहिलेल्या अजित पवार यांना वित्त, नियोजन आणि ऊर्जा ही जुनी खाती पुन्हा मिळाली आहे. जुनी खाती पुन्हा मिळविण्याकरिता अजितदादांना बरीच प्रतीक्षा करावी लागली.
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. अधिवेशनात अजितदादांना बिनखात्याचे मंत्री राहावे लागले होते. अजितदादा सांगतात तसे स्वत:हून त्यांनी अधिवेशनापुरते बिनखात्याचे मंत्री राहायचे ठरविले होते की, पक्ष नेतृत्वाने त्यांना प्रतीक्षा करावी लावली याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. गेल्या शनिवारी बारामतीमध्ये नाटय़संमेलनाच्या उद्घाटन समारंभात आपल्याकडे खाती सोपवा ही सांगण्याची वेळ अजितदादांवर आली होती. यावरून बरेच काही अर्थ काढले जाऊ लागले होते. शेवटी सोमवारी रात्री वित्त, नियोजन आणि ऊर्जा ही तीन खाती अजितदादांकडे सोपविण्याचा आदेश जारी झाला. मंत्रालयात अजितदादांनी आज खात्यांचा पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर गृह विभागाशी संबंधित बैठक अजितदादांनी बोलाविली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह गृह सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, वित्त सचिव आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. गृह खात्याला आवश्यक निधी देण्याचे आश्वासन याप्रसंगी अजितदादांनी दिले.