महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे हरविलेले आत्मभान पुन्हा मिळवून देण्यासाठी माझ्या एक वर्षांच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच घुमान येथे पार पडले. संमेलनाध्यक्ष या नात्याने पुढील वर्षभराच्या कालावधीतील उपक्रम व योजनांविषयी डॉ. मोरे यांना विचारले असता ते बोलत होते.
महाराष्ट्राचा इतिहास योग्य प्रकारे माहिती नसल्यामुळे किंवा आपण तो विसरलो असल्याने आजचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपला इतिहासच आपल्याला माहिती माहिती नसल्याने आपले आत्मभान हरविले आहे. त्यामुळे या आत्मभानाची जाणीव करुन देण्याची आवश्यकता आहे. मराठी माणसाच्या इच्छा-आकांक्षा, वर्तमानातील आणि भविष्यातील त्याच्या समोरचे प्रश्न, देशाच्या इतिहासात मराठी माणसाचे असलेले स्थान, मराठी माणसाचे देशासाठी विविध क्षेत्रातील असलेले योगदान हे आजच्या तरुण पिढीबरोबरच महाराष्ट्राच्या भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
संत नामदेव साडेसातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून पंजाब येथे गेले, दीर्घकाळ राहिले आणि त्यांनी तेथे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ऐक्य साधले. संत नामदेवांच्याच प्रेरणेने आपण संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध स्तरातील लोकांच्या भेटीगाठी घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगून डॉ. मोरे म्हणाले, अर्थात हे काम माझ्यासाठी नवीन नाही. संमेलनाध्यक्ष नव्हतो तेव्हाही माझे काम सुरुच होते. आता संमेलनाध्यक्ष या नात्याने हे काम सुरु राहणार आहे. व्याख्याने, प्रवचन, किर्तन, सभा-संमेलनातून आपण हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा