मुंबईचे महापौरपद मिळवण्यासाठी एक-एक नगरसेवकांची जमवाजमव करताना राजकीय पक्षांची दमछाक होत असताना, दुसरीकडे मात्र गेल्या १० वर्षांपासून शिवसेनेबरोबर असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. गीता गवळी यांच्या पाठिंब्याने भाजपचे संख्याबळ ८४ इतके झाले आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. गुरूवारी दुपारी गीता गवळी यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली होती. परंतु, गवळी यांनी पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्यत्व किंवा आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची मागणी केल्यामुळे ही बैठक फिसकटल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर गवळी यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेऊन भाजपला समर्थन देण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती.
Arun Gawli's daughter and corporator from Akhil Bharatiya Sena (ABS) extend support to BJP #BMCPolls2017 pic.twitter.com/UfkYgU5MXj
आणखी वाचा— ANI (@ANI_news) March 3, 2017
आज (शुक्रवार) सकाळी भाजप कार्यालयात जाऊन गीता गवळी यांनी आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कोकण भवनमध्ये जाऊन त्या गटनोंदणी करणार असल्याचे समजते. जो पक्ष सत्तेत जास्तीत जास्त सहभाग देईल त्याच पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे गीता गवळी यांनी स्पष्ट केले होते. गुरूवारी खासदार अनिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी पाठिंब्याबाबत चर्चाही केली. त्यावेळी त्यांनी सत्तेत सहभाग मागितला होता. परंतु, शिवसेनेने त्यांची मागणी फेटाळली होती. त्यामुळे गीता गवळी यांनी भाजपचा पर्याय स्वीकारल्याचे सांगितले जाते. शिवसेना नेत्यांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांना भेटण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अचानक गुरूवारी सांयकाळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाठिंब्याबाबत चर्चा केली. फडणवीस यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी भाजपला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. लोकांनी भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे आपण त्यांना समर्थन देणार असल्याचे गवळी यांनी सांगितले होते.