मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या १ जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. एकीकडे ठाकरे गटाचा मोर्चा निघणार असून भाजपाने आता त्यांच्या आक्रोश मोर्चाची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्यांविरोधात कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजपा उद्या १ जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहे, अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज दिली.
हेही वाचा >> “मुंबई महाराष्ट्राच्या भाळावरील ठसठशीत कुंकू, हेच…”; ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्त्र; म्हणाले, “१०५ हुतात्म्यांच्या…”
“मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तुम्ही लुट केली, दरोडा टाकलात. तीन लाख कोटींचा हिशोब द्या. तो आम्ही मागतोच आहोत. कोविड काळात १२ हजार कोटींचा घोटाळा केला. बॉडी बॅगपासून ऑक्सिजन प्लॅन्ट, जम्बो कोविड सेंटर, पीपीई कीट, औषधं, लसी, बेडशीट कव्हर इथपर्यंत आपल्या बगलबच्च्यांना, पीए आणि आजूबाजूच्या लोकांना मालमाल करण्यासाठी उद्धवजी तुम्ही वापर केला. चौकशी तर चालू आहे. हिशोब आम्ही तुमच्याकडून मागतोय. म्हणून मुंबईचा आक्रोश मोर्चा नरीमन पॉईंट येथील भाजपाच्या कार्यालयापासून मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत जाईल. महिला मोर्चा दादरला स्वामी नारायण मंदिराच्या येथून सुरू होऊन पोलीस आयुक्तालयापर्यंत जाईल. या प्रकरणात चौकशी आणि अटक आतापर्यंत का केली नाही याचा जाब आम्ही विचारू”, असं आशिष शेलार यानी सांगितलं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
उबाठाचे आंदोलन चोर मचाए शोर आंदोलन
“चोर मचाए शोर या पद्धतीचा मोर्चा उबाठाचा आहे. स्वतः केलेलं पाप, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, स्वतःला लागलेल्या चौकशा, स्वतःच्या जवळचे लोक उघडे पडायला लागलेत, यावर पांघरून घालण्याकरता त्यांचा मोर्चा असला तरीही मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार आहे. हा आक्रोश आंदोलन फक्त भाजपा करत नाहीय तर शिवसेना आणि रिपांई मिळून करतो आहोत. एका बाजूला आम्ही भाजपा, शिवेसना, रिपाई महायुती मुंबईकरांसाठी प्रश्न विचारत आहोत, तर त्या ठिकाणी उबाठाच्या आंदोलनाला अजूनतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झिडाकरलेलं दिसतंय. उबाठाच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने समर्थन दिलं नाही. याचा अर्थ त्यांची बाजू उघडी आहे. याचाच अर्थ आदित्य ठाकरेंचं नेतृत्त्व आणि त्याच्या जवळच्या बगलबच्यांना उघडं करण्यापासून वाचवण्याकरता केलेला हा प्रयत्न आहे. म्हणून त्यांचं आंदोलन म्हणजे चोर मचाए शोर आंदोलन आहे. आणि मुंबईकरांचा आक्रोश मुंबईकरांच्या खिशातील एक एक रुपयाचा हिशोब मागणारे आंदोलन आहे”, असंही आशिष शेलार म्हणाले.