अनिश पाटील
देशाच्या इतिहासातील २४ सप्टेंबर २००२ हा एक काळा दिवस. याच दिवशी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ३० नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर २१ वर्षांनी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व दहशवताद विरोधी यंत्रणांनी देशभरातील २०० हून अधिक ठिकाणी छापे टाकून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियाचे (आयसिस) दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त केले. पण या दोन्ही घटनांमध्ये एक संबंध उघड झालाय.
देशाच्या इतिहासातील २४ सप्टेंबर २००२ हा एक काळा दिवस. याच दिवशी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ३० नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ८० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर २१ वर्षांनी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व दहशवताद विरोधी यंत्रणांनी देशभरातील २०० हून अधिक ठिकाणी छापे टाकून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियाचे (आयसिस) दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त केले. पण या दोन्ही घटनांमध्ये एक संबंध उघड झालाय.
हेही वाचा >>> अधोविश्व: दाऊद टोळीचा रुग्णालयात गोळीबार
अक्षरधाम हल्ल्यातील संशयित फरहातुल्ला घोरी उर्फ अबू सुफियान उर्फ सरदार साहेब उर्फ फारू याचा अनेक वर्षांपासून शोध सुरू आहे. वय वर्षे ६०. मनात भारताविषयी प्रचंड द्वेष. तरुणांची माथी भडकवण्यासाठी डार्क वेब, तसेच समाज माध्यमांवरून सक्रिय असलेल्या घोरी पाकिस्तानात वास्तव्याला असल्याचे पुरावे भारतीय यंत्रणांना मिळाली आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतीच ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. हे तिन्ही संशयित दहशतवादी पुणे आयसिस मॉड्यूलमधील फरार आरोपी आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ पाळत ठेवल्यानंतर शोध मोहीम आणि देशभरात २०० हून अधिक ठिकाणी छापे टाकल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. तपासात आलम हा पाकिस्तानातील मोहम्मद फरहातुल्ला घोरी याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. त्यामुळे घोरी सध्या आयसिससाठी काम करत असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशवादी संघटनांसाठी नाव जोडण्यात आलेल्या घोरीला भारतात फरार घोषित करण्यात आले आहे. घोरी हा डार्क वेबवरील चॅट ग्रुपद्वारे कार्यरत असल्याचे केंद्रीय यंत्रणांना आढळून आले आहे. घोरी आणि त्याचे सहकारी, स्लीपर सेलसोबत संवादासाठी काही गेमिंग अॅप्स वापरतात. गुप्तचर यंत्रणांनी त्यांचे काही चॅट्स डार्क वेब चॅट प्लॅटफॉर्मवर मिळवल्या होत्या. समाज माध्यमांद्वारे जातीय सलोखा बिघडवणे, अशा कामांमध्येही तो सक्रिय आहे.
हेही वाचा >>> अधोविश्व : दहशतवादी आणि पैशांचे गैरव्यवहार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट गेल्या काही महिन्यांपासून भारतात सक्रियपणे दहशतवादी कारवाया करत आहे. घोरी दहशतवादी हल्ल्यांसाठी अनेक आक्रमक तरुणांना मानसिकदृष्ट्या तयार करणे, त्यांची माथी भडकवणाचा प्रयत्न करत होता. त्यासाठी घोरी या तरुणांना प्रक्षोभक भाषणे आणि साहित्य पाठवायचा. दिल्ली स्पेशल सेलच्या अटक आरोपींकडून असे संशयास्पद डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २००५ ला हैदराबाद आत्मघाती हल्ल्यामध्येही तो संशयित आहे. याशिवाय बंगळूरुमध्ये भारतीय राजकारणी, ज्येष्ठ पत्रकार आणि धार्मिक नेत्यांच्या हत्येच्या कटात घोरीचा संबंध उघडकीस आला होता. घोरीला भारताने दहशतवादी घोषित केला आहे. नुकतेच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्याचे संभाषण प्राप्त केले असून त्यात तो तरुणांची माथी भडकवताना दिसत आहे. आपले तरुण केवळ त्यांच्या चुकीमुळे भारतीय यंत्रणांच्या हाती लागतात, असे तो आपल्या भाषणात वारंवार सांगत असल्याचे निदर्शनास आले आहे.
समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठी करावा, त्यात इतर कारवाया करू नये, असा सल्ला घोरी देत आहे. सध्या पाकिस्तानात वास्तव्याला असलेल्या घोरीच्या विरोधात हा महत्त्वपूर्ण पुरावा मानला जात आहे.