चित्रपटांमधून सामाजिक संदेश देणा-या खिलाडी अक्षय कुमारने वैयक्तिक आयुष्यातूनही लोकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’ चित्रपटातून शौचालयाचा मुद्दा उपस्थित करत अक्षय कुमारने एका गंभीर विषयावर भाष्य केलं होतं. पण हे फक्त चित्रपटापुरतं मर्यादित न ठेवता अक्षय कुमारने ख-या आयुष्यातही लोकांना प्रभावित केलं आहे. अक्षय कुमारने स्वत:च्या पैशातून जुहू चौपाटीवर बायो-टॉयलेट बांधलं आहे. यासाठी अक्षय कुमारने १० लाख रुपये खर्च केले आहेत.
काही महिन्यांपुर्वी ट्विंकल खन्नाने एक व्यक्ती जुहू चौपाटीवर खुल्या जागेत शौचाला बसल्याचा फोटो शेअर केला होता. यावेळी तिने टॉयलेट एक प्रेम कथाच्या दुस-या भागाचा हा पहिला सीन असल्याचा टोला लगावला होता. यानंतर काहीजणांनी ट्विंकल खन्नाचं कौतूक केलं होतं, तर काहीजणांनी अशाप्रकारे गरिब व्यक्तीची खिल्ली उडवणं चुकीचं असल्याचं म्हणत टीका केली होती. ट्विंकल खन्नाच्या ट्विटनंतर अनेकांनी झोपटपट्टीत राहणा-या गरिबांकडे शौचालय बांधता यावं इतके पैसे नसतात. त्यामुळे खुल्यावर शौचाला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो असं म्हटलं होतं.
दरम्यान, खिलाडी अक्षय कुमारने जुहू बीच शौचालयमुक्त करण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत मिळून पुढाकार घेतला असून बायो टॉयलेट बांधलं आहे. अक्षय कुमारने जुहू बीचवर शौचालय बांधलं जावं यासाठी १० लाखांचा निधी दिला होता. या पैशांचा वापर करत जुहू बीचवर सार्वजनिक शौचलाय बांधण्यात आलं आहे. अक्षय कुमारच्या सहकार्यामुळे समस्या काही प्रमाणात सुटली आहे. मात्र जुहू आणि वर्सोवा बीच शौचालयमुक्त करायचा असेल तर अशाच प्रकारचे अजून तीन ते चार सार्वजनिक शौचालय बांधण्याची गरज असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.
महापालिका अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शौचालयात तीन पुरुष आणि तीन महिलांची शौचालयं आहे. लघुशंकेसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच बीचवर दुर्गंध पसरु नये याकरिता बायो डायजेस्टर वापरण्यात आला आहे, जेणेकरुन बीचवर फिरायला येणा-यांना आणि स्थानिकांनी त्रास होऊ नये.