मुंबई : अनेकदा विविध सामाजिक व ऐतिहासिक चित्रपटांना आणि त्यामधील कलाकारांना टीकेचा सामना करावा लागतो. यासंदर्भात समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठवली जाते किंवा काही वेळा मनोरंजनसृष्टीतील कलाकारांकडूनही भाष्य केले जाते. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या नावात ‘टॉयलेट’ हा शब्द असल्यामुळे अशा नावाचे चित्रपट मी कधीच पाहणार नाही, असे विधान मध्यंतरी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी केले होते.

अखेर ‘केसरी चॅप्टर २’च्या निमित्ताने माध्यमांसमोर आलेल्या अभिनेता अक्षय कुमारने या टीकेसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. ‘मी केलेले ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सारखे चित्रपट सामाजिक आशय मांडणारे होते. सामाजिक चित्रपटांवर कोणी एखादा मूर्खच टीका करेल’, अशी भूमिका घेणाऱ्या अक्षयने जया बच्चन यांनी चित्रपट पाहणार नाही, अशी भूमिका घेतली असेल तर त्यांचे बरोबर आहे. असे चित्रपट करून मी काही चुकीचे काम केले आहे, असे त्यांना वाटत असेल तर त्यांची बाजू बरोबर आहे, असेही त्याने सांगितले.

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात सरकारी योजनांची भलामण करणाऱ्या चित्रपटासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुळात ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हे काय चित्रपटाचे नाव आहे का ? अशा नावाचा चित्रपट तुम्ही पाहाल का ? मी तरी अशा नावाचे चित्रपट पाहणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यासंदर्भात बोलताना, विनाकारण कोणी आपल्या चित्रपटांवर टीका करेल असे वाटत नसल्याचे अक्षय कुमारने सांगितले. त्याने आतापर्यंत केलेल्या ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘एअरलिफ्ट’, ‘केसरी’ अशा चित्रपटांचा उल्लेख केला.

मी हे चित्रपट मनापासून केले आणि या प्रत्येक चित्रपटातून लोकांपर्यंत काही ना काही विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा पध्दतीच्या सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांवर कोणी मूर्खच टीका करू शकेल, अशी भावना त्याने व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी मी हे चित्रपट करून चूक केली आहे, असे जया बच्चन यांना वाटत असेल तर त्यांची बाजू बरोबर असू शकते, अशी सावध भूमिकाही त्याने घेतली.

जालियनवाला बाग हत्याकांडासंबंधित घटनांवर आधारित ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट १८ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अक्षयने ही भूमिका मांडली. ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटात अक्षय कुमार हा जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा देणाऱ्या सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे. तर आर. माधवन ब्रिटिश साम्राज्याच्या वकिलाची भूमिका साकारत असून अनन्या पांडे ही दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे.