मुंबई : घर खरेदीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेतील सर्व व्यवहारांना तेजी आल्याचे चित्र आहे. घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश आणि नवीन प्रकल्पांचा आरंभ असे व्यवहार आज तेजीत आहेत. तर दुसरीकडे मे महिन्याच्या केवळ पहिल्या दहा दिवसांत मुंबईत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला घर, सोने, वाहन खरेदीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे सहाजिकच या दिवशी मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी घर खरेदी करण्याकडे वा नवीन घरात प्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी मालमत्ता बाजारपेठेतील सर्वच व्यवहार तेजीत असतात. परिणामी, मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच तीन हजार २८० घरांची विक्री झाली आहे. घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला २९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

हेही वाचा…कोकण रेल्वेचा विस्टाडोम डबाही प्रतीक्षा यादीत

अक्षय तृतीयेला घरविक्रीत वाढ होते. या संधीचा फायदा घेण्यासाठी विकासक अक्षय तृतीयेला अनेक सवलती देतात. यंदाही विकासकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक सवलती दिल्या आहेत. काहींनी घर खरेदीवर सवलत जाहीर केली आहे, तर काहींनी मुद्रांक शुल्क वा इतर शुल्क माफी वा शुल्कात सवलत देऊ केली आहे. त्याचवेळी काही विकासकांनी विविध भेटवस्तू देऊ केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या नाण्यांपासून अगदी मोड्युलर किचन, फर्निचर आदी भेटवस्तूंचा यात समावेश आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहक आणि विकासकांसाठी महत्त्वाचा असतो. विकासक या दिवशी नवीन प्रकल्पांना सरुवात करतात. त्यानुसार आज मुंबईत अनेक ठिकाणी नवीन गृहप्रकल्पांना सुरुवात होत असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

Story img Loader