दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची मैत्रीण अनिता अडवाणी आणि अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री डिम्पल कपाडिया, टिंवकल खन्ना व रिंकी खन्ना यांनी परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याची सूचना वांद्रे न्यायालयाने केली आहे. त्यासाठी न्यायालयाने अक्षय, डिम्पल, टिंवकल आणि रिंकी या चौघांना ४ डिसेंबर रोजी न्यायालयात न चुकता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या चौघांविरुद्ध अनिता अडवाणी हिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली आहे. आपल्याला ‘आशीर्वाद’मध्ये प्रवेश मिळावा, अन्यथा तेवढय़ाच किमतीचे घर द्यावे. त्याचप्रमाणे मासिक देखभाल खर्च देण्याबाबत आदेश देण्याची विनंती अडवाणी हिने केली आहे. वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनीही तिच्या तक्रारीची दखल घेत डिंपल, अक्षय, टिंवकल यांना नोटीस बजावून मंगळवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी महानगरदंडाधिकारी एस. एस. देशपांडे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने वादी-प्रतिवाद्यांनी परस्पर सामंजस्याने याप्रकरणी तोडगा काढावा, अशी सूचना केली. त्यासाठी खन्ना कुटुंबीयांनी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यावर खन्ना कुटुंबीयांतर्फे न्यायालयात हजर न राहण्याची मुभा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच याप्रकरणी परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्यास दोन्ही पक्ष तयार झाल्यास मध्यस्थाची नेमणूक केली जाईल, परंतु त्यासाठी वादी-प्रतिवादींनी न्यायालयात हजर राहणे गरजेचे असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मध्यस्थाची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
अक्षय, डिम्पल, टिंवकल, रिंकीला न्यायालयात हजर होण्याचे आदेश
दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची मैत्रीण अनिता अडवाणी आणि अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री डिम्पल कपाडिया, टिंवकल खन्ना व रिंकी खन्ना यांनी परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याची सूचना वांद्रे न्यायालयाने केली आहे.
First published on: 28-11-2012 at 04:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay twinkle dimple rinki to present in court order