मुंबई – भविष्यात माझा चरित्रपट कुणी तयार केला तर त्यात आलिया भट्ट या अभिनेत्रीने माझी भूमिका साकारावी अशी इच्छा सुधा मूर्ती यांनी टाटा लिटरेचर लाईव्ह फेस्टीव्हलमधील ‘पीपल ऑफ द लॅण्ड’ या चर्चासत्रात व्यक्त केली. मी आलीयचे अनेक चित्रपट पहिले आहेत. त्यातील राझी, गंगूबाई काठियावाडी, हायवे या चित्रपटांमधील तिचे काम मला विशेष आवडले. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तसेच तिचा चेहरा फार बोलका आहे. म्हणून आलिया भट्टने भविष्यात माझी भूमिका साकारली तर मला फार आनंद होईल, असे सुधा मूर्ती म्हणाल्या.
मूर्ती यांनी अभिनेता शाहरूख खान याच्या कामाची प्रशंसा करताना वीर- झारा चित्रपटात केलेल्या त्याच्या कामाबद्दल कौतुक केले. ‘वीर- झारा’ चित्रपटातील वीर ही भूमिका शाहरूख खान सोडून आणखी कोणी साकारू शकत नाही. प्रेमासाठी २५ वर्षे भोगलेले दुःख त्याच्या अभिनयातून सहजरित्या व्यक्त होते, असे सुधा मूर्ती म्हणाल्या. तसेच इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांची भूमिका शाहरूख खानने साकारली तर आवडेल का? या प्रश्नाला त्यांनी सहमती दर्शवली.
हेही वाचा – परराज्यातील औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफडीएचे संकेतस्थळ
हेही वाचा – शिवीगाळ केली म्हणून जाब विचारल्याने केली हत्या
सुधा मूर्ती या टाटा मोटर्सच्या पहिल्या महिला अभियंता होत्या. इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका, समाजसेविका, लेखिका आणि शिक्षिका अशी सुधा मूर्ती यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याबरोबरच साधेपणा आणि नम्रपणामुळेही नेहमीच लक्ष वेधून घेतात. त्यांच्या या स्वभावामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे सुधा मूर्ती अनेकांसाठी आदर्श आहेत.